December 8, 2023
पायाभूत सुविधा आणि विकास कामे

सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे, ६ जून, (हिं. स) : ठाण्यातील समूह पुनर्विकास योजनेचे काम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. सुमारे 1500 हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे 10 हजार घरांची निर्मिती होणार आहे. हा एक ऐतिहासिक प्रकल्प होणार आहे. ज्या दिवशी या योजनेतील घराची चावी नागरिकांना मिळेल तो दिवस माझ्यासाठी सर्वात परमोच्च आनंदाचा दिवस असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतींचा पुर्नविकास करण्यासाठी आखलेल्या ठाण्यातील समूह विकास योजनेच्या (क्लस्टर) कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या सुविध पत्नी श्रीमती लता शिंदे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) व अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खासदार कुमार केतकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, माजी आमदार रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते. किसन नगर येथील समूह विकास योजनेच्या कामांची सुरुवात 1997मध्ये पडलेल्या साईराज इमारतींतील रहिवासी दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आली. यावेळी क्लस्टर योजनेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, 1997 मध्ये ठाण्यातील साईराज इमारत पडल्यानंतर अनधिकृत धोकादायक इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनधिकृत इमारती या गरजेपोटी बांधल्या होत्या. घरे अनधिकृत असली तरी माणसे तर अधिकृत होती. त्यामुळे या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तेव्हापासून अनेक आंदोलने, संघर्ष केले. आज कित्येक वर्षानंतर या योजनेचे काम सुरू होत आहे. ही योजना मार्गी लागण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. ठाण्यातील या क्लस्टर योजनेचे काम आता सुरू झाले असून इमारती पूर्ण होईपर्यंत ते काम सुरू राहिल. या योजनेत नुसतेच इमारती उभ्या राहणार नाहीत, तर येथे मोकळी मैदाने, उद्याने, आरोग्याच्या सुविधाही असतील. एक सुनियोजित शहर उभारण्याचे आमचे स्वप्न आहे. सिडकोद्वारे बांधण्यात येणाऱ्या घरांच्या दर्जा पेक्षाही चांगल्या गुणवत्तेची घरे येथे उभारण्यात येतील. अधिकृत इमारती व सध्या सुरु असलेल्या पुनर्विकास योजनेतील इमारतींना या क्लस्टर योजनेत समावेश हा ऐच्छिक ठेवला असून यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठाण्याप्रमाणेच मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मीराभाईंदर, कल्याण, भिवंडी आदी क्षेत्रातील अनधिकृत धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेचा मार्ग मोकळा केला आहे. मीरा भाईंदरमधील क्लस्टर योजना दिवाळीनंतर सुरू होईल, असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक तेथे नियमात बदल करून आता असे प्रकल्प शासनामार्फत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, महाप्रित, एसआरए आणि अन्य सर्व गृहनिर्माण संस्थांची मदत घेऊन हे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

हे शासन सर्वसामान्यांचे सरकार आहे. गेल्या अकरा महिन्याच्या काळात सर्वसामान्यांसाठीच निर्णय घेण्यात आले आहे. थांबलेल्या प्रकल्पाना या सरकारने चालना दिली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

खासदार श्री. केतकर म्हणाले की, पत्रकार असल्यापासून ठाण्यातील क्लस्टरचा संघर्ष पाहिलेला आहे. ही योजना सुरू होईल की नाही, याविषयी शंका होती. मात्र, आता ही योजना प्रत्यक्षात सुरू होत असल्याचा आनंद आहे. पूर्वी ठाण्याला खेडेगाव समजत होते. मात्र, आता या योजनेमुळे ठाण्याला मुंबईचा दर्जा मिळेल.

आमदार श्री. केळकर म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश मोठ्या वेगाने वाढत आहे. येथील नागरिकांना चांगल्या सुखसोई देण्याचे काम या शासनाच्या काळात होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली क्लस्टर योजनेला चालना देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. क्लस्टर योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी श्री. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हावे लागले. ठाण्यातील विविध भागातही ही योजना राबविण्याची गरज आहे. मिनी क्लस्टर योजनेची अनेक भागात गरज असून शासनाने यावर विचार करावा.

यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी मनोगत व्यक्त केले तर महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी प्रास्ताविकात क्लस्टर योजनेची माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक ज्याची वाट पाहत आहेत, तो क्लस्टर योजनेच्या कामांची सुरुवात होण्याचा दिवस आज आला आहे. आज ठाणेकरांच्या भाग्याचा दिवस आहे. ठाणे शहरात शौचालये दुरुस्ती, सौंदर्यीकरण, रस्ते विकासाची अनेक कामे सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे उपक्रमातून ठाणे शहराचा चेहरा बदलत असल्याचे श्री. बांगर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना जमिनीचे ताबा पत्रे देण्यात आली तर महाप्रितचे बिपीन श्रीमाळी यांना करारनामा पत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय या योजनेसाठी सहकार्य करणाऱ्या महापालिका आयुक्त श्री. बांगर, वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रँक्टर, संजय देशमुख, विशेष सल्लागार मंगेश देसाई यांच्यासह जमिन मालकांचा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुर्नविकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या कामाची सुरूवात अंतिम भूखंड क्र. 186/187 या वरील 7753 चौ.मी क्षेत्रफळावरील भूखंडावर त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक 22 लगतचा भूखंड क्रमांक एफ – 3 या ठिकाणी 19275 चौ.मी. एवढ्या जागेवर करण्यात येणार आहे. नागरी पुनरुत्थान 1 व 2 ची अंमलबजावणी सिडकोमार्फत होणार आहे. त्याचप्रमाणे समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्री श्री. शिंदे हस्ते झाले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

योगी यांची BJP, मोदी यांची BJP आणि पुण्यातली BJP यांच्यात काही ताळमेळच नाही लव्ह जिहाद हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कट आहे! Love Jihad is an International Conspiracy! ब्रिटिशांच्या सैन्या मध्ये सर्व जातीचे लोक होते, कोरेगांव भीमा च्या स्तंभावर मेलेल्यांची नावे आहेत दाऊद,छोटा शकील, हाजी मस्तान, करीम लाला असे स्मगलर अफजलच्या कबरीवर जमायचे – मिलिंद एकबोटे अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम तोडले, हे आमच्या आंदोलनाचे यश!
योगी यांची BJP, मोदी यांची BJP आणि पुण्यातली BJP यांच्यात काही ताळमेळच नाही लव्ह जिहाद हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कट आहे! Love Jihad is an International Conspiracy!